Mahabaleshwar News: पालिकेचा मोठा निर्णय! स्वच्छतेचा ‘व्हीडीके’चा ठेका रद्द; पाणी दरवाढीची टांगती तलवार?
Mahabaleshwar News: अकार्यक्षमता आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे 'व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस'चा ३ वर्षांचा करार अखेर गुंडाळला; पालिका सभेत सर्वानुमते निर्णय.

Mahabaleshwar News – महाबळेश्वरमधील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेचे काम पाहणार्या व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस या कंपनीचा तब्बल 11 कोटी 25 लाख 17 हजार 775 रुपयांचा ठेका रद्द करण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला. ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट करत, स्वच्छता समितीचे सभापती अॅड. संजय जंगम यांनी हा प्रस्ताव मांडला.
विरोधी नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत करत, ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 27) दुपारी 1 वाजता सुरू झालेली सभा रात्री 8 वाजेपर्यंत चालली. सत्ताधारी व विरोधी गटांनी चर्चा करून, बहुतांश विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. पालिकेने स्वच्छतेचा ठेका व्हीडीके कंपनीला दीड वर्षापूर्वी दिला होता.
पूर्वी या कामासाठी पालिकेचा वार्षिक खर्च सव्वा ते दीड कोटी रुपये असताना, ठेकेदाराला वर्षाकाठी साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात येत होती. मात्र, कामातील हलगर्जीपणा, अपुरे मनुष्यबळ आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे हा ठेका वादाच्या भोवर्यात अडकला होता. अनेक बैठका होऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने, अखेर तीन वर्षांचा हा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाणी दरवाढीवर विशेष सभा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणार्या पाण्याच्या दरात वाढ केल्याने, पालिकेवर दरमहा तीन ते साडेतीन लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठीच्या पाणीदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. मात्र, या विषयावर विशेष सभा घेऊन, अंतिम निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.
याबाबत सर्व पक्षांनी एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्याची गरज उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती नासीर मुलाणी यांनी व्यक्त केली. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी अधोरेखित केली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन, हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना नगरसेवक संतोष शिंदे यांनी केली.




