मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट

भोपाळ : ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. त्यातच आजचा दिवस राज्य सरकारला महत्त्वाचा दिवस मानला जात आहे. मध्यरात्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. राज्यपालांनी कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. विधानसभेच्या कामकाजामध्ये आज बहुमत चाचणीचा उल्लेखही नाही. त्यमुळे आता राज्य सरकारच्याबाबतीत मोठा सस्पेन्स कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
कमलनाथ यांच्या प्रतिनिधी मंडळानेही काल राज्यपालांची भेट घेतली. बहुमत चाचणीविषयी कमलनाथ यांना विचारणा केली असता याबाबत त्यांनी कोणतंही स्पष्ट उत्तर दिले नाही. बहुमत चाचणीबाबत विधानसभा अध्यक्ष उत्तर देतील, असे कमलनाथ यांनी सांगितले.
भाजपचे आमदार मध्यरात्री 2.30 वाजता भोपाळमध्ये दाखल झाले. कमलनाथ सरकार कोसळणार असे सगळ्या आमदारांचे म्हणणे होते. कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अद्यापही बंगळुरु येथेच आहेत. बंडखोर आमदारांनी भोपाळमध्ये सुरक्षेची मागणी केली आहे. बंडखोर 22 आमदारांपैकी केवळ सहा आमदारांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे उरलेल्या 16 आमदारांकडून कमलनाथ यांना अपेक्षा आहेत. म्हणूनच रविवारी कॅबिनेट बैठकीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ऑल इज वेलचा दावाही केला होता.
जयपूरमधून आलेल्या कॉंग्रेस आमदारांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. कॉंग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत होती. या आमदारांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली होती. त्यानंतर सर्व आमदारांची कोरोना तपासणी करण्यात यावी मागणी केली जात आहे. या माध्यमातून भाजपच्या आमदारांशी संपर्क साधण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.




