Madhuri dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची आणि अदांची जादू आजही कायम आहे. वयाची साठी जवळ आली असतानाही तिचा ग्लॅमरस अंदाज, दिलखेचक हास्य आणि नृत्याची मोहिनी चाहत्यांना भुरळ घालत असते. मात्र, यावेळी माधुरी तिच्या सौंदर्यामुळे किंवा फॅशनमुळे नव्हे, तर मुलगा आरिन नेने याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
निमित्त ठरलं ते प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने आयोजित केलेली दिवाळी पार्टी! या पार्टीत माधुरी पती डॉ. श्रीराम नेने आणि मुलगा आरिनसोबत पोहोचली होती. पण सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते आरिनसोबत आलेल्या एका खास मुलीने!
‘आरिन’ने या पार्टीत कथित गर्लफ्रेंड खुशीसोबत एन्ट्री घेतली आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. इतकंच नाही, तर माधुरी आणि श्रीराम नेने यांनीही या दोघांसोबत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्याने ‘हीच का माधुरीची होणारी सून?’ असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
कोण आहे माधुरीच्या लेकाची गर्लफ्रेंड?
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा आरिन नेने याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिकरीत्या समोर येत नाही. मात्र, आता त्याच्या कथित प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आरिनसोबत दिसलेल्या या तरुणीचं नाव खुशी असल्याचं समोर आलं आहे.
अमेरिकेत असताना दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचं वृत्त आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टवरून दोघेही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या सहवासात असल्याचे संकेत मिळतात.
खुशीचे सोशल मीडिया फोटो चर्चेत!
आरिनची कथित गर्लफ्रेंड खुशी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचं इन्स्टाग्राम अकाउंट सार्वजनिक आहे. ती अनेकदा आरिनसोबतचे फोटो आणि खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. अमेरिकेतील त्यांच्या भेटीगाठी, एकत्र घालवलेला वेळ आणि रोमँटिक क्षणांची झलक तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळते.
मे महिन्यातील एका पोस्टमध्ये तिने ‘#2years’ आणि ‘#bless’ असे हॅशटॅग वापरले होते. त्यावर आरिनने ‘My heart’ अशी कमेंट केली होती. त्यामुळे दोघांच्या नात्याची चर्चा अधिकच रंगली. या सगळ्यात आणखी एक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
ती म्हणजे माधुरी दीक्षित आणि खुशी यांच्यात दिसणारी जवळीक! खुशीने माधुरीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे माधुरीला मुलाच्या या नात्याची माहिती असून कुटुंबासोबत खुशीचा चांगला परिचय असल्याचे दिसते.
इतकंच नाही, तर माधुरीच्या आगामी ‘माँ बहन’ या नेटफ्लिक्स प्रोजेक्टच्या सेटवरही खुशी पोहोचली होती. तिथे तिने हातात क्लॅपबोर्ड घेऊन फोटो शेअर केला होता.
दरम्यान, आरिन आणि खुशी यांनी अद्याप आपल्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, दिवाळी पार्टीतील त्यांची एकत्रित उपस्थिती, सोशल मीडियावरील प्रेमळ कमेंट्स आणि माधुरीसोबतचे फोटो यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सध्या मनोरंजनविश्वात रंगली आहे.








