माधुरी दीक्षित यांना ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड’ प्रदान

पुणे – सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे (एसजीबीएफ) पहिलाच “सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड-2023′ प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना प्रदान करण्यात आला. जयपूरमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व “एसजीबीएफ’चे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते माधुरी यांना सन्मानित करण्यात आले.
सूर्यदत्त ग्रुप यंदा रौप्य महोत्सवी साजरे करत असल्याचे सांगून चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त ग्लोबल अवॉर्डने माधुरी यांचा गौरव केला. माधुरी दीक्षित यांनी “सूर्यदत्त’च्या 25 वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. “सूर्यदत्त’चा हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे नमूद करत माधुरी म्हणाल्या, समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
तसेच नव्याने स्थापन केलेला सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरम जगभरातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून व्यवसायाची आदान-प्रदान करण्याची संधी निर्माण करत आहे. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, स्थापनेच्या पहिल्याच वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक स्तरावर व्यवसायवृद्धी, उद्योगांच्या आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमची स्थापना करण्यात आली आहे.
सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे पहिल्या पुरस्काराचे वितरण
पुणे -सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांना सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड प्रदान करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया.





