माधुरी दीक्षितची राजकारणात एंट्री ? ‘त्या’ फोटोने रंगली सोशलवर चर्चा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान माधुरी दीक्षित स्टेडियममध्ये दिसली. यावेळी ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बसलेली दिसली. प्रफुल्ल पटेल , आशिष शेलार असे अनेक राजकीय नेते तिथे उपस्थित होते. यादरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर होत आहे.
माधुरी दीक्षित मुंबईतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. माधुरी उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही जागा शिवसेनेच्या खात्यात असून, शिंदे गटात असलेले गजानन कीर्तिकर येथून खासदार आहेत. मात्र, यावेळीही त्यांची प्रकृती ठीक नाही.
अशा स्थितीत करारानुसार भाजप या जागेवर माधुरी दीक्षित यांना उमेदवारी देऊ शकते. यावेळीही या जागेवर काँग्रेसकडून संजय निरुपम हेच मोठे दावेदार असून कीर्तीकर यांच्या विरोधात मजबूत पर्याय आहे. अशात माधुरीच्या लढतीमुळे निरुपम यांचा मार्ग अवघड होणार आहे. अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या सर्व चर्चांवर माधुरीकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चर्चांवर माधुरीचे काही चाहते तिला शुभेच्छा देतांना दिसत आहे तर काही तिला ट्रोल करतांना दिसत आहे. माधुरी राजकारणात येणार की नाही यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येते आहे.





