Hindi Cinema : फक्त एकच चित्रपट बनवला, दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले; पण सन्मानाच्या दिवशीच दिग्दर्शकाचा दुर्दैवी अंत
Hindi Cinema : मात्र, या यशाचा आनंद साजरा करण्याआधीच अवतार कृष्ण कौल यांच्यावर काळाने घाला घातला.

Hindi Cinema : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्दर्शकांनी आपल्या कलाकृतींमधून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मात्र काहींची कारकीर्द अल्पकाळाची असली तरी त्यांचे योगदान अजरामर आहे. त्यांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. आज अशाच एका दिग्दर्शकाविषयी जाणून घेणार आहोत. त्यांनी संपूर्ण आयुष्यात फक्त एकच चित्रपट दिग्दर्शित केला, त्या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, पण दुर्दैवाने पुरस्कारांची घोषणेच्या दिवशी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं, याविषयी जाणून घेऊ…. (Hindi Cinema)
या दिग्दर्शकाचे नाव होते अवतार कृष्ण कौल. 1974 साली प्रदर्शित झालेला त्यांचा ‘27 डाउन’ हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. मुख्य प्रवाहातील चित्रपटांशी फारकत घेऊन कौल यांनी 27 डाउन ही अप्रतिम कलाकृती तयार केली. या चित्रपटात राखी गुलजार आणि एम. के. रैना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर संगीताची धुरा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी सांभाळली होती. लेखक रमेश बक्षी यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाने समीक्षकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.

27 डाऊन चित्रपटातील एक दृश्य
‘27 डाउन’ला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी या चित्रपटाचा गौरव करण्यात आला. मात्र, या यशाचा आनंद साजरा करण्याआधीच अवतार कृष्ण कौल यांच्यावर काळाने घाला घातला. (Hindi Cinema)
राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आणि मृत्यू (Hindi Cinema)
20 जुलै 1974 रोजी मुंबईतील वाळकेश्वर परिसरात एक मुलगी समुद्रात बुडत असल्याचे पाहून अवतार कृष्ण कौल तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र या धाडसी प्रयत्नात त्यांनी स्वतःचा जीव गमावला. विशेष म्हणजे, याच दिवशी त्यांच्या ‘27 डाउन’ चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले होते. अवघ्या 34 वर्षांचे असताना अवतार कृष्ण कौल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. आजही ‘27 डाउन’ हा चित्रपट त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारा पहिला आणि शेवटचा चित्रपट म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा : Mohan Bhagwat : RSS प्रमुख मोहन भागवत प्रवास करत असलेल्या ट्रेनवर दगडफेक; हल्लेखोरांचा शोध सुरू





