Made In India: A Titan Story….. घड्याळाचा थक्क करणारा अविस्मरणीय प्रवास
Made In India: A Titan Story

Made In India: A Titan Story – OTT च्या माध्यमातून मनोरंजनाची नवीन दालनं उघडी झालीत आणि नवनवीन गोष्टींचा खजिनाच उघडला गेला… OTT वरील सगळ्यात लोकप्रिय content म्हणजे crime thriller, हॉरर कॉमेडी, suspense thriller इत्यादी.. पण या सगळ्या पेक्षा अतिशय वेगळी खिळवून ठेवणारी तेवढीच प्रेरणादायी गोष्ट म्हणजे ऍमेझॉन mx player वरील Made In India – The Titan Story चा थक्क करणारा प्रवास….
टाटा भारताचा आपला ब्रँड… सर्व जगात भारताची ओळख निर्माण करणारा ब्रँड म्हणजे टाटा… याच टाटा समूहाचा घड्याळाच्या उद्योगात अभूतपूर्व क्रांती घडवणारा ब्रँड म्हणजे Titan… याच Titan च्या जन्माची कहाणी.
कथेच्या केंद्रस्थानी आहे झक्सिस देसाई. टाटा उद्योग समूहात जनरल मॅनेजर म्हणून काम करणारे अतिशय होतकरू व्यक्तिमत्व आणि त्यांना वेळीवेळी मार्गदर्शन करणारे जे. आर. डी. टाटा..
एका सरकारी बांधकाम कंपनीत विशेष अधिकारी म्हणून टाटातून देसाई जातात आणि काम संपल्यावर पुन्हा टाटा मध्ये परत येतात.. परंतु परत आल्यावर काय काम करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. तेव्हा जेआरडी त्यांना एक आव्हान म्हणून बुडीत गेलेल्या टाटा प्रेस कंपनीला फायद्यात आणायची जबाबदारी देतात..
देसाई आव्हान स्वीकारतात. कामाच्या संदर्भात त्यांना चेन्नईला जावं लागते आणि तिथे त्यांना विदेशी घड्याळाच्या तस्करीची माहिती मिळते आणि संपूर्ण भारतीय बनावटीचे घड्याळ बनवण्याची संकल्पना सुचते आणि इथून सुरू होतो टायटनचा प्रवास…
या संपूर्ण प्रवासाचे अतिशय रंजकपणे सादरीकरण या ६ भागाच्या वेब सिरीज मध्ये केले आहे.
टाटा या ब्रँड चे भारतीय बाजारपेठीतील अमूल्य योगदान,त्यांची निर्मिती मूल्य, त्यांची कामाची पद्धत आणि ग्राहकांचा असलेला अतूट विश्वास, कर्मचाऱ्यांबद्दल असलेली आत्मीयता व जिव्हाळा या सगळ्या गोष्टींच्या कसोटीवर खरं उतरण्यासाठी देसाई आणि त्यांची सगळी टीम अनेक चढ उतार आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करतात हे प्रत्यक्ष पाहणे योग्य ठरेल..
टाटा समूह म्हणजे ठोस विश्वास, कामाप्रति असलेली निष्ठा आणि पारदर्शकता, मूल्य याचे अप्रतिम सादरीकरण यात आपल्याला पाहायला मिळतं..
देसाई जे आर डी ना भारतातील घड्याळाच्या बाजारपेठेबद्दल सांगतात आणि परदेशी घड्याळांची होत असलेली तस्करी आणि त्याची उपलब्ध असलेली बाजारपेठ या बद्दल सविस्तर माहिती सांगतात आणि आपण या निर्मिती क्षेत्रा मध्ये उतरणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगतात. पण जेआरडी त्याकडे दुर्लक्ष करतात…
परंतु युरोप मधील विमान प्रवासात जेआरडींना प्रत्येकाच्या हातातील वेगवेगळी घड्याळ पाहून या गोष्टीचे महत्त्व पटत आणि ते स्वित्झर्लंड मध्ये एका विदेशी कंपनीसोबत उत्पादन सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवतात पण भारतीय लोक हे घड्याळ बनवू शकत नाही कारण तेवढी तुमची क्षमता नाही.
तिथे फक्त कामगार वर्गच आहे असं अपमान करून जेआरडींना परत पाठवतात…. भारतात परत आल्यावर ते देसाईंना ताबडतोब घड्याळ निर्मितीसाठी कामाला लागायच्या सूचना देतात.
टायटनच्या प्रवासाची सुरवात तामिळनाडू पासून सुरू होते. कर्मचाऱ्यांची नेमणूक, प्रशासकीय अडचणी, जागेची उपलब्धता,कुशल तंत्रज्ञ,घड्याळ बनवण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री तसेच घड्याळाचे मार्केटिंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडवल…
या सगळ्या गोष्टींवर मात करत देसाई आणि त्यांची टीम यश आणि अपयशयाचा सामना करत आपले उद्दिष्ट गाठतात की नाही हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.
दिग्दर्शक रोबी ग्रेवाल यांच्या सफाईदार दिग्दर्शनाने वेब सिरीज एक वेगळीच उंची गाठण्यात यशस्वी झाली आहे.. अनेक बारीक बारीक गोष्टींचा तपशील यात दाखवला गेला आहे. तसेच बॅकग्राऊंडला जुन्या हिंदी गाण्यांचा अतिशय सुरेख वापर केलेला आहे. तसेच जुने फोटोग्राफ्स आणि मुंबई चे दर्शन आपल्याला 80 च्या दशकात घेऊन जातात…
वेब सिरीज ची अजून जमेची बाजू म्हणजे कलाकारांची योग्य निवड आणि त्यांनी केलेला अप्रतिम अभिनय त्यामुळे वेब सिरीज लक्षणीय ठरते…
जे आर डी च्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अक्षरशः जान आणली आहे… अतिशय चपखल पणे त्यांनी भूमिका निभावली आहे.
वेळ पडेल तेव्हा कठोर आणि तेवढेच मृदू असलेले जे आर डी ,भूमिकेतील अनेक लहान बारकावे, त्यांची देहबोली,वेशभूषा पूर्णतः आत्मसात करून मूर्तीमंत जेआरडी उभे केले आहेत आणि याच्यातूनच नसिरुद्दीन यांचे अभिनयातील महत्त्व आणि भूमिकेवरची जबरदस्त पकड अधोरेखित होते…
झक्सिस देसाई च्या भूमिकेला जिम सरभ यांनी पुरेपूर न्याय दिला आहे.. ध्येयवादी, कामाचा ध्यास असलेले, नवनवीन संकल्पना घेऊन येणारे, जिद्दी, कधीही हार न मानणारे, सहकाऱ्यांना घेऊन चालणारे प्रेमळ व्यक्तिमत्व सरभ यांनी उत्कृष्टरित्या उभं केले आहे…
आपण तयार केलेले पहिले घड्याळ हातात घेतल्याचा आनंद आणि युरोपियन मार्केटमध्ये आलेले अपयशाने खचलेले आणि तेवढ्याच ताकदीने पुन्हा उभ राहून जगातील सगळ्यात स्लिम घड्याळ गर्वाने दाखवणारे, Titan ची signature Tune ऐकून प्रफुल्लित होणारे देसाई आणि ज्या ज्या कंपनीने अपमानित करून वापस पाठवले होते त्याच कंपनीला टेक ओव्हर करण्याकरता जाणारे देसाई अशा अनेकविध छटा सरभ यांनी आपल्या अभिनयातून उभ्या केल्या आहेत… त्यांचे जीआरडी सोबतचे अनेक प्रसंग मस्त जमून आले आहेत.
आकाश दीक्षित या भूमिकेत आपला मराठमोळा वैभव तत्ववादी भाव खाऊन गेला आहे..त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीतली ही सगळ्यात लांब भूमिका आहे आणि ती त्याने चोखपणे पार पाडली आहे.. इतर जे नवखे कलाकार आहेत त्यांनी पण आपापल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत..
या सिरीजचे संवाद हे याचे बलस्थान आहे. अतिशय परिणामकारक आणि सूचक असे संवाद यामुळे सिरीज मध्ये वेगळाच रंग भरला गेला आहे.
एकंदरीत बऱ्याच दिवसांनी एक सशक्त आणि प्रेरणादायी विषयावर आधारित वेब सिरीज झाली आहे जी नक्कीच आपल्याला अंतर्मुख करते आणि कधीही हार न मानण्याची आणि सतत पुढे जाण्याची प्रेरणा देत राहते…
- राहुल सराफ
नागपूर… २२. ०६. २६





