मॅक्रॉन यांनी युरोपला केले आश्वस्त; अण्वस्त्रांद्वारे सुरक्षेची दिली ग्वाही

पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रशिया संपूर्ण युरोपच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत, धोके लक्षात घेऊन आपल्या युरोपीय मित्र राष्ट्रांना फ्रान्सच्या अण्वस्त्रांद्वारे संरक्षण दिले जाण्याबद्दल त्यांनी सूतोवाच केले आहे. मॅक्रॉन यांनी बुधवारी पॅरिसमध्ये केलेल्या भाषणात या गोष्टी सांगितल्या. मॅक्रॉन म्हणाले, फ्रान्स युक्रेन आणि युरोपला सर्वतोपरी मदत करत राहील.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा युरोपचे अमेरिकेशी तेवढेसे चांगले राहीलेले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलिकडेच रशिया-युक्रेन युद्धासह इतर अनेक मुद्द्यांवर युरोपवर नाराजी व्यक्त केली आहे आणि नाटो संघटनेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्याच वेळी, मॅक्रॉन यांनी अमेरिकन प्रशासनाकडून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत होणाऱ्या बदलांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
फ्रान्सला संरक्षणावर अधिक खर्च करावा लागेल आणि त्याच वेळी युक्रेनला मदत करत राहावी लागेल, असे फ्रेंच अध्यक्षांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात म्हटले. आम्हाला अमेरिकेकडून पाठिंबा मिळेल अशी आशा आहे पण जर तसे झाले नाही तर युरोपला प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, जागतिक व्यवस्थेला विस्कळीत करणाऱ्या अलीकडील घटनांबद्दल तुम्ही चिंतित आहात हे मला माहिती आहे आणि हे खरे आहे की आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशिया फ्रान्स आणि युरोपसाठी धोका बनला आहे.
ते म्हणाले, आपले अण्वस्त्र आपले संरक्षण करतात आणि आता ते संपूर्ण युरोपसाठी वापरले जाईल. मी युरोपियन खंडातील आपल्या मित्र राष्ट्रांच्या अण्वस्त्रांच्या माध्यमातून सुरक्षेवर एक धोरणात्मक वादविवाद सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.





