M. K.Stalin : तामिळनाडूमधील एआयएडीएमके प्रमुख ई. के. पलानीस्वामी यांचे राजकीय भवितव्य अंध:कारमय आहे. भारतीय जनता पक्षासह त्यांची युती असल्याने आगामी काळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासारखेच काहीतरी होईल, असे विधान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M. K.Stalin) यांनी केले आहे. अण्णा द्रमुकचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या समर्थकांना द्रविड मुन्नेत्र कळघममध्ये सामील करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री स्टॅलिन (M. K.Stalin) यांनी हे विधान केले. डीएमकेमधून बहिष्कृत झालेले नेते पनीरसेल्वम अलीकडेच सत्ताधारी द्रमुकमध्ये सामील झाले. त्यावेळी स्टॅलिन बोलत होते. स्टॅलिन म्हणाले की, ओ. पन्नीरसेल्वम हे निष्ठेचे समानार्थी आहेत, तर पलानीस्वामी हे विश्वासघाताचे प्रतीक आहेत. पलानीस्वामी स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करतील. पलानीस्वामी यांनी एम. जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांनी स्थापन केलेल्या एआयएडीएमके पक्षाला भाजपकडे गहाण ठेवून विश्वासघात केला आहे. पलानीस्वामींना वाटते की भाजप त्यांचे भले करेल. पण भाजप कधीही कोणाचेही भले करत नाही. केंद्रीय सत्ताधारी पक्षावर टीका करताना स्टॅलिन म्हणाले, काहीही चांगले न करणारा भाजप एआयएडीएमकेसाठी काही चांगले करेल का? ते एआयएडीएमकेचे रक्त शोषेल. जर पलानीस्वामींना याबद्दल काही शंका असेल तर त्यांनी बिहारकडे पाहावे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची बातमी तशीच धक्कादायक आहे. पलानीस्वामींनाही नितीश कुमारांसारखेच नशिब भोगावे लागेल. पलानीस्वामी हे या निवडणुकीपर्यंतच अण्णाद्रमुकचे प्रमुख राहतील. त्यानंतर त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले जाईल.