M.K.Stalin : केवळ राहुल गांधींनाच भाऊ म्हणतो – एम.के.स्टॅलिन

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी असणारे सौहार्दाचे संबंध अधोरेखित केले. इतर राजकीय नेत्यांचा उल्लेख मी भाऊ म्हणून करत नाही. मात्र, राहुल यांना भाऊ म्हणतो, असे त्यांनी नमूद केले. द्रमुक या पक्षाचे प्रमुख असणाऱ्या स्टॅलिन यांनी राहुल यांना भाऊ म्हणण्याचे कारणही उघड केले.
राहुल यांना माझ्याविषयी वाटणारी आपुलकी मी शब्दांत मांडू शकत नाही. प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवरून बोलताना ते मला प्रिय बंधू म्हणतात. ते मी विसरू शकत नाही. आमच्यात केवळ राजकीय मैत्री नसून वैचारिक संबंधही आहेत. एकेकाळी द्रमुक आणि कॉंग्रेस पक्ष भिन्न मार्गांवरून वाटचाल करत होते. मात्र, आज देशाच्या कल्याणासाठी, ऐक्यासाठी आणि तमिळनाडूच्या विकासासाठी एका टीमचा भाग बनलो आहोत.
समान विचारांतून आम्ही प्रवास करत आहोत. आमच्यातील सामंजस्यामुळे देशाचे भविष्य सुरक्षित बनेल, असा विश्वास त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. तमिळनाडूतील द्रमुकच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांमध्ये कॉंग्रेसचा समावेश आहे. ते दोन्ही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या इंडिया आघाडीचे भाग आहेत.





