M K Stalin – केंद्र सरकारकडून हिंदी भाषेची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी भाजप सरकारवर तिखट शब्दांत टीका केली. केंद्र सरकार हिंदी लादण्याच्या बाबतीत आता सर्व मर्यादा ओलांडत असून, तामिळ अस्मितेशी खेळू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तिरुच्चिरापल्ली येथील रेल्वे विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला ‘कर्तव्य द्वार’ असे नाव देण्यात आल्याने राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिरुच्चिरापल्ली रेल्वे कार्यालयाच्या या कमानीवर हिंदी नावाचा वापर केल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवत स्टॅलिन यांनी समाजमाध्यमावर आपली भूमिका स्पष्ट केली. एक भाषा, तीन लिपी या नावाखाली केंद्र सरकार तमिळ आणि इंग्रजी भाषेऐवजी हिंदी नावांचा वापर करून छुप्या पद्धतीने भाषा लादण्याचे काम करत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. रेल्वे कार्यालयावर कर्तव्य द्वार लिहिण्याचा प्रयत्न हा तमिळ भाषेचा अपमान आहे. ही नावे तातडीने बदलून तिथे योग्य तमिळ नावांचा समावेश करावा, अन्यथा भाजपला तामिळ जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. M K Stalin यावेळी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारने बदललेल्या विविध नावांचा पाढाच वाचला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाला ‘भविष्य निधी भवन’ म्हणणे असो वा नवीन फौजदारी कायद्यांना संस्कृत नावे देणे असो, केंद्र सरकार सातत्याने हिंदी आणि संस्कृतचा आग्रह धरत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जलसंपदा मंत्रालयाचे नाव ‘जलशक्ती’ करणे आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नामांतर करणे, हे केंद्राच्या वाढत्या अहंकाराचे प्रतीक असल्याची टीका त्यांनी केली. तामिळनाडूच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्या या प्रवृत्तीला धडा शिकवण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.