आलिशान कार, शेअर बाजारात गुंतवणूक अन् करोडोंची प्रॉपर्टी; विनेश फोगटची एकूण संपत्ती किती?

Vinesh Phogat Net Worth | कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेस पक्षाकडून हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाटला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. विनेशने बुधवारी (11 सप्टेंबर) काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिने निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे.
विनेशने सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, तिचे 2023-24 या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न 13 लाख 85 हजार 152 रुपये आहे. तर तिचा पती सोमवीर राठीचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 44 हजार 220 रुपये एवढे आहे. विनेश कुटुंबाकडे रोख 2 लाख 10 हजार रुपये आहेत.
याशिवाय विनेशचे ॲक्सिस, एसबीआय आणि आयसीआयसीआय या बँकांमध्ये खातेही आहे, यात सुमारे 40 लाख रुपये आहेत. तर तिच्या पतीचे दोन बँक खाते असून एका बँकेत 48,000 रुपयांची एफडी आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक
विनेशची शेअर बाजारात वैयक्तिक गुंतवणूक नाही. मात्र तिच्या पतीने शेअर बाजारातील एकूण 6 कंपन्यांमध्ये 19 लाख 7 हजार रुपयांहून अधिकची गुंतवणूक आहे. याशिवाय, विनेशचा 1.50 लाख रुपयांचा विमाही आहे. तर तिच्या पतीकडे 14 लाख 59 हजार रुपये प्रीमियमची पॉलिसी आहे.
महागड्या कार
विनेशचीकडे 3 आलिशान कार तर तिच्या पतीकडे एक आलिशान कार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार या वाहनांची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये एवढी आहे. तिच्याकडे Volvo XC 60, Hyundai Creta, Toyota Innova आणि TVS Jupiter बाइक आहे. याशिवाय तिच्या पतीच्या नावावर एक Mahindra Scorpio-N आहे.
विनेशची स्थावर-जंगम मालमत्ता
काँग्रेस उमेदवार विनेशकडे 1.10 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 1.85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर तिच्या पतीकडे एकूण 57.35 लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. डिसेंबर 2019 मध्ये विनेश फोगाटने 1 कोटी 85 लाख रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती, तिचे बाजार मूल्य आता 2 कोटी रुपये आहे.
विनेश फोगाटच्या नावावर किती कर्ज ?
विनेश फोगाटच्या नावावर 13.61 लाख रुपयांचे कार लोन आहे. तर तिच्या पतीवर 19.32 लाख रुपयांचे कर्ज आहे. विनेशकडे 35 ग्रॅम सोने आणि 50 ग्रॅम चांदी आहे. याशिवाय तिच्या पतीकडे 28 ग्रॅम सोने आणि 100 ग्रॅम चांदी आहे.
दरम्यान, मंगळवारी जाहीर झालेल्या भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कॅप्टन योगेश बैरागी यांना विनेश फोगाटविरोधात जुलाना येथून तिकीट मिळाले आहे. तर जुलाना विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे माजी कुस्तीपटू कविता दलाल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता येथे तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
हरियाणा: काँग्रेसने जाहीर केली चौथी यादी, 4 नावांवर सस्पेन्स कायम





