पुणे जिल्हा | कोरेगाव भीमात लम्पीने जनावरे दगावली

कोरेगाव भीमा, (वार्ताहर)- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे जनावरे दगावत असताना पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गांधारीची भूमिका घेत आहे. दोन महिन्यांपासून लम्पीची लस येवुनही सहा महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने जानावरांना लस न दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यात जनावरे दगावत आहेत. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. दरम्यान, दोन दिवसांत डॉक्टर न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच संदीप ढेरंगे यांनी दिला आहे.
कोरेगाव भीमाच्या पशु वैद्यकीय अधिका-यांची सहा महिन्यांपूर्वी बदली होऊनही राज्य शासनाच्या वतीने अद्याप याठिकाणी डॉक्टर उपलब्ध करुन दिला नाही. याबाबत कोरेगाव भीमाचे सरपंच ढेरंगे यांनी दीड महिन्यापासून सहाय्यक आयुक्त नितीन पवार यांच्यासह गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याकडे पाठपुरावा करीत असुनही दाद प्रशासनाने दिली नाही.
त्यातच लम्पी रोगाच्या दोन महिन्यांपूर्वी लस कोरेगाव भीमाच्या दवाखान्यात येऊनही जनावरांना दिल्या गेल्या नसल्याने जनावरांना लम्पी रोगाची लागण होऊन आठवड्यात दोन जनावारे दगावली आहेत.
यावेळी लम्पीच्या साथीने दगावलेल्या जनावरांची पाहणी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त नितीन पवार, पशुधन विकास अधिकारी ऋषीकेश जगताप यांनी केली. यावेळी सरपंच संदीप ढेरंगे, माजी सदस्य अशोक गव्हाणे, ग्राहक पंचायतीचे भानुदास सरडे, शेतकरी बाळासाहेब सुपेकर आदी उपस्थित होते.
डॉक्टरांच्या बदल्याबाबत शासनाचा स्टे असल्याने डॉक्टर मिळाले नसल्याचे सांगत स्टे उठला असून डॉक्टर उपलब्ध झाल्यावर तात्काळ कोरेगाव भीमाला देऊ.- नितीन पवार, सहाय्यक आयुक्त. पशु संवर्धन विभाग
दोन दिवसांत डॉक्टर द्या; अन्यथा आंदोलन- ढेरंगे
कोरेगाव भीमामध्ये गेली सहा महिन्यांपासून जनावरांचा डॉक्टर उपलब्ध नाही. याबाबत प्रशासनाकडे दीड महिन्यांपासून पाठपुरावा करुनही डॉक्टर मिळत नसल्याने व लम्पीचे लसीकरन न झाल्याने जनावरे दगावत आहेत. दोन दिवसात डॉक्टर न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच संदीप ढेरंगे यांनी दिला.





