LPG PRICE HIKE: LPG सिलेंडर पुन्हा महागला ; व्यावसायिक गॅसच्या दरात ‘एवढ्या’ रुपयांची वाढ
LPG PRICE HIKE: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे.

LPG PRICE HIKE: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ₹9.50 ने वाढ केली आहे.
नवे दर 1 सप्टेंबर 2026 पासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असून, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्रात 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता ₹2,701 झाली आहे. ऑगस्ट महिन्यात हा सिलेंडर ₹2,691.50 रुपयांना मिळत होता. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीलाच त्यात ₹9.50 ची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील व्यावसायिक ग्राहकांना या वाढीव दराचा फटका बसणार आहे.
दरम्यान, मुंबई आणि पुण्यात 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत ₹941.50 इतकीच आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजी वापरणाऱ्या ग्राहकांना सध्या या दरवाढीपासून दिलासा मिळाला आहे.
हॉटेल-रेस्टॉरंटच्या खर्चात वाढ होणार LPG PRICE HIKE:
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, केटरिंग व्यवसाय, मिठाईची दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये केला जातो. त्यामुळे सिलेंडर महागल्याने या व्यावसायिकांचा इंधन खर्च वाढणार आहे. परिणामी, वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी हॉटेलमधील जेवण, नाश्ता तसेच मिठाईच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेषतः सणासुदीचा काळ सुरू होत असताना व्यावसायिक गॅसच्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. मिठाई आणि खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होत असल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होऊ शकतो.
5 किलोच्या सिलेंडरमध्येही बदल LPG PRICE HIKE:
19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसोबतच काही 5 किलोच्या नॉन-डोमेस्टिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र, 5 किलोचा रेग्युलर एलपीजी सिलेंडर ₹349.50 आणि एक्स्ट्रालाइट सिलेंडर ₹339 इतकाच आहे.
एकीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली असताना, दुसरीकडे घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल न केल्याने सामान्य कुटुंबांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.






