गाव हादरलं…! प्रेमीयुगुल वीज टॉवरला लटकलं; घटनेने परिसरात खळबळ

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला दाेरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात उघडकीस आली. रोहित रमेश लिंगायत (वय-२५, रा. उचली) आणि १४ वर्षीय मुलीने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उचली येथील रोहित लिंगायत याचे चांदली येथील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. ती भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहून नववीचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी वसतिगृहातून ती घरी आली होती. तिचे वडील मजुरीला तर आई घरकामात व्यग्र असताना रोहित हा २६ फेब्रुवारीला सकाळी दुचाकीवर तिच्या घरासमोर आला.
घराबाहेर बोलावून तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले. आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र ताे बंद आढळून आला. त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, उचली शिवारातील वीज टॉवरला गळफास लावून दोघांनी आत्महत्या केल्याचे काही नागरिकांना आढळून आले. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर मृत प्रेमीयुगुलाची ओळख पटली. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येचे कारण पोलिस शोधत आहेत.

