Pune : लाडक्या बहिणींना मिळणार “पिंक-ई रिक्षा’

पुणे : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने “पिंक-ई रिक्षा’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तीन लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ३ हजार रिक्षांसाठीचे अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट महापालिका प्रशासनास देण्यात आले असून, आतापर्यंत १३५ अर्ज आले आहेत.
या बाबतची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाने दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बालकल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार शासनकडून ई- रिक्षासाठी नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका तसेच या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या खासगी बँकाकडून ई-रिक्षा किमतीच्या ७० % कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ती, राज्य शासन २० टक्के निधी देणार आहे तर लाभार्थी महिला, मुली यांना १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. या रिक्षासाठी देण्यात येणारे ७० टक्के कर्ज लाभार्थी महिलांना ५ वर्षांत परतफेड करावे लागणार आहे. योजनेचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज कागदपत्रांसह या ठिकाणीच जमा करावे लागणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे.
अर्जदार महिलीचे वय २० ते ४० वर्षे आवश्यक
लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विधवा, कायद्याने घटस्फोटित, दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य




