मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोघेही एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान चित्रा वाघ यांनी शरद पवारांवर आरोप करत त्यांना आणि सुप्रिया सुळेंना इशारा दिला आहे. पवार साहेब, तुमच्या या गँगला आवरा, असे कच्चे खिलाडी पाठवू नका अन्यथा तोंडावर पडाल असं चित्रा वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर आरोप 20 वर्षांमध्ये पायाचे कातडे काढून पक्षाला दिले, पण शरद पवारांनी आपल्याला काय दिलं असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला. त्या म्हणाल्या की, पवारसाहेब आणि बारामतीच्या ताईंना माझ्या कामाची उजळणी होईल. चित्रा वाघमध्ये काहीतरी क्वॉलिटी आहे म्हणून संधी मिळाली. गेल्या 20 वर्षात त्यांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडली. काय परिणाम होतील याची काळजी न करता मी जबाबदारी पार पाडली. कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चित्रा वाघला 20 वर्षांत एकही लाभाचं पद दिलं नाही असे म्हणाल्या आहेत. शरद पवारांना दिला इशारा चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना इशारा दिला. त्या म्हणाल्या की, पवारसाहेब, याने तुम्हाला वाटत असेल की माझ्यावर दबाव येईल, चित्रा वाघचा आवाज दाबला जाईल तर तसं होणार नाही. पवारसाहेब, असे कच्चे खिलाडी पाठवू नका, तोंडावर पडाल. पवारसाहेबांवर मी बापासारखं प्रेम केलं, पण त्याबदल्यात तुम्ही काय दिलं असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. त्या म्हणाल्या की, कुठूनतरी कसेतरी गोत्यात आणायचं काम करताय ना ते थांबवा. 20 वर्षे तुमच्या पक्षात होते. तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचं काम केलं. मी सगळं सहन केलं. अशा किती बायका माझ्याविरोधात उभ्या कराल? माझं नाव 100 लोकांसोबत जोडलं. आता या बाईला उभं केलं. तुमच्याकडे ही गौरी चव्हाण आली असती तर काय केलं असतं? कुणीही महिला अडचणीत आली तर मी तिला सहकार्य करणारच. आता हा सुरू झालेला वाद नेमका कुठेपर्यंत जाऊन थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर असताना असे राजकारणाच्या पलीकडचे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप चांगलेच वाढू शकता, हे मात्र स्पष्ट आहे. या सगळ्या प्रकरणावर अद्याप भाजप आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.