-“हडपसर’ किंवा “पूर्व हवेली’ पालिका व्हावी -शहर हद्दीलगतच्या गावांत प्रचंड नागरीकरण -पाणीपुरवठा, सांडपाणी-कचऱ्याचे आव्हान -दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण 500 टनांनी वाढणार पुणे – नव्याने समाविष्ट 23 गावांमुळे पुणे ही राज्यातील सर्वांत मोठी महापालिका झाली आहे. त्यामुळे विभाजन करून नवीन महापालिका स्थापन करण्याची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. “हडपसर’ अथवा “पूर्व हवेली’ अशी महापालिका स्थापन करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तर, उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत सकारात्मक भूमिका यापूर्वी अनेकदा व्यक्त केली आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही महापालिकेच्या एका कार्यक्रमात “शहराची हद्द मर्यादित असावी,’ अशी भूमिका व्यक्त केली आहे. त्यामुळे याबाबत शासन काय निर्णय घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. हद्दीत 2017 मध्ये आलेली 11 गावे आणि आता 23 गावांमुळे पालिकेची हद्द 253 वरून थेट 518.77 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रास सुविधा पुरवणे अडचणीचे होणार आहे. या गावांची लोकसंख्या कागदोपत्री अवघी 4 लाख असली, तरी प्रत्यक्षात मात्र या भागात प्रचंड नागरीकरण झालेले आहे. त्यामुळे कागदांवरील आकड्यांच्या दीडपट ही लोकसंख्या असण्याची शक्यता आहे. 11 गावांच्या समावेशानंतर महापालिकेस 15 टीएमसी पाण्याची आवश्यकता होती. तर, आता 23 गावांमुळे तब्बल 18 टीएमसी पाणी लागणार आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीतील 70 टक्के पाणी पुण्यासठी द्यावे लागणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील शेती तसेच सिंचन योजनांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. तर, या गावांचा तब्बल 400 ते 500 टन कचरा वाढणार आहे. या गावांचे सांडपाणीही वाढणार असून, त्यांना आरोग्य सेवा देणे पालिकेस अत्यंत कठीण जाणार आहे. आतापर्यंत दोन वेळा महापालिकेत नवीन गावे आल्यानंतर शासनाने रुपयाचेही अनुदान दिलेले नाही. परिणामी, या सुविधा गावांमध्ये द्यायच्या असल्यास शासनास नवीन महापालिकेचाच विचार करावा लागणार आहे. 34 गावांमध्ये सर्वाधिक गावे पूर्व आणि दक्षिण भागातील आहेत. त्यामुळे “पुणे महापालिकेतील हद्द कायम ठेवून तसेच भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन सात ते आठ गावे पालिकेत घेऊन उपूर्व हवेली किंवा हडपसर महापालिका करावी,’ असा राजकीय सूर आहे.