महाविकास आघाडीला धक्का देत कोल्हापुरात कमळ फुललं; भाजपाचे धनंजय महाडिक विजयी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. ऐनवेळी शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तर महाविकास आघाडी सरकारचे प्रत्येकी एक म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना फक्त ३८ मतं मिळाली असून धनंजय महाडिकांना ४१ मतं मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे.
तिथे दुसरीकडे भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांची चाणक्य नीती कामी आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. “चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.





