पिंपरी | महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान

पिंपरी, (प्रतिनिधी) – महावितरण तळवडे शाखा अभियंता यांनी संगनमताने 40 घरगुती व व्यापारी वीज जोड देताना प्रति वीजजोडकरिता निर्धारित रक्कम भरुन न घेता कमी शुल्कात वीज जोड दिले. अधिकारी, शाखा अभियंता यांनी संगनमताने महावितरणचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक माहिती पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिव नितीन बोंडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत उजेडात आणली आहे.
या प्रकरणी दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर फौजदारी खटले दाखल करून या अधिकारी व अभियंता याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सचिव नितीन बोंडे यांनी महावितरणकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयाकडून तळवडे येथील एका इमारतीच्या 40 घरगुती व व्यापारी वीज जोडणीसाठी 127 किलो व्हॅट वीज भार मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी महावितरणच्या एनएससी योजनेंतर्गत 100 केव्हीए ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवून त्याठिकाणी 200 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
परंतु, ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढविणेचे काम झाले नसतानाही तळवडे शाखा अभियंता यांनी 40 पैकी 22 वीज जोडण्यांना वीज मीटर बसविले आहेत. नागरिकांचा व ग्राहकांचा जीव धोक्यात घालून वीज जोडण्या दिल्या आहेत.
माहिती अधिकारात मिळालेल्या दस्तावेजानुसार माहितीनुसार, नियमानुसार 127 किलो व्हॅट लोडची मंजुरी असताना शाखाधिकारी यांनी अर्जदाराला फक्त 40किलो व्हॉट इतक्या लोडचे शुल्क भरण्याची चलने दिली. अर्जदाराने चलने भरल्यावर नियमानुसार ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर वीज जोडण्या दिल्या जाणे अपेक्षित असताना, शाखाधिकारी यांनी प्राधिकरण उपविभागीय अधिकार्यांच्या संगनमताने 22 वीज जोडण्याचे वीज मीटर जागेवर बसविले जे देखील आर्थिक फसवणूक करत वीज कंपनीचे नुकसान केल्याच्या गुन्ह्याच्या कक्षेत येते.
पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी संचालक हे 25 लाखांपेक्षा अधिक अंदाजपत्रकाची तपासणी करण्यास सांगत आहेत. स्वखर्चाने केलेल्या एक पूर्णांक तीन टक्के कामाची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिकार्यांना पाठवत आहेत. वास्तविक कुठल्याही प्रादेशिक कार्यालयात असा नियम अस्तित्वात नाही.
पुणे प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणार्या तीन झोनपैकी केवळ पुण्यातच मनमानी पध्दतीने कामे केली जात आहेत. इतर कोणत्याही झोनमध्ये असा नियमाने काम सुरु असल्याचे दिसत नाही. प्रभारी संचालकाच्या मनमानीला चाप लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. – संतोष सौंदणकर, पिंपरी-चिंचवड शहर संघटक, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)





