मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या ‘त्या’ तलाठ्याचे तडकाफडकी निलंबन

अमरावती : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यादरम्यान अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात काल महिलांकडून पैसे घेत असल्याचे उघडकीस आले होते. यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तुळशीरामच्या निलंबनाचे आदेश दिले.
काय आहे लाडकी बहीण योजना?
ही योजना 21 ते 60 वर्षे वय असलेल्या महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. १ जुलैपासून या योजेनच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे.




