Bangladesh Violence: ‘लुटलेली शस्त्रे ३ तारखेपर्यंत परत करावी’; बांगलादेश पोलिसांचे नागरिकांना आदेश

Bangladesh Violence – बांगलादेशातील हिंसक आंदोलनादरम्यान पोलीस स्थानकांमधून लुटलेली शस्त्रे आणि दारुगोळा ३ सप्टेंबरपर्यंत परत जमा करण्याचे आदेश पोलिसांनी नागरिकांना दिले आहेत.
आरक्षण कोटा विरोधी आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या हिंसाचारात बांगलादेशात मोठा हिंसाचार, जाळपोळ आणि पोलीस स्थानकांची लुटालूट झाली होती.
पोलिसांकडून लुटली गेलेली शस्त्रे आणि दारुगोळा तात्काळ पुन्हा जमा केला गेला पाहिजे, असे पोलीस मुख्यालयाने दिलेल्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.
देशातील सर्व नागरिकांना शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाच्या सरकारच्या काळात देण्यात आलेले शस्त्र परवाने रद्द करण्याचा निर्णय बांगलादेशातील हंगामी सरकारने यापूर्वीच घेतला आहे.
आपल्या जवळील परवाना असलेली शस्त्रे ३ सप्टेंबरपर्यंत जमा करण्यात यावीत. त्यानंतर ५ सप्टेंबरला एका मोहीमेद्वारे देशभरातील शस्त्रे जमा करून घेतली जातील, असे आदेशांमध्ये म्हटले आहे.
अनेक शस्त्रे पुन्हा जमा…
पोलिसांकडून लुटली गेलेली वेगवेगळ्या प्रकारची ३,८७२ शस्त्रे प्रशासनाने आतापर्यंत पुन्हा जमा करून घेतली आहे. याशिवाय २,८६, २१६ काडतुसे, २२,२०१ अश्रुधुराच्या नळकांड्या आणि २,१३९ स्टन ग्रेनेड देखील जमा केले गेले आहेत.





