Pune | मित्र, मैत्रिणी किंवा जोडीदार शोधताय

पुणे, – नवीन मित्र, मैत्रिणी किंवा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप चा वापर करत असाल तर सावधान, अन्यथा फसवले जाऊ शकता ! सध्या, समलैंगिक, उभयलिंगी, तृतीयपंथी यांच्यासाठीच्या ग्रींडर ॲप च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. ग्रींडर ॲप हा हनी ट्रॅपचाच एक प्रकार आहे. या अॅपद्वारे पुणे, नागपूर आणि दिल्लीमधील अनेकांना गंडा घालण्यात आला आहे.
ग्रींडर हे एलजीबीटीक्यू समुदायासाठीचे एक मोफत डेटिंग ॲप आहे. मोबाइल हा सर्वांचीच दैनंदिन गरज झाला आहे. मित्र- मैत्रिणी आणि जोडीदार शोधण्यासाठी विविध चॅटिंग आणि डेटिंग ॲपचा वापर करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, सायबर चोरट्यांनी या डेटिंग ॲपवरूनच फसवणुकीचा फंडा शोधला आहे.
अशी होते फसवणूक…
ग्रींडर या डेटींग ॲपद्वावरे तरुण-तरुणीशी ओळख निर्माण केली जाते. सुरूवातीला त्यांच्याशी छान संवाद साधत एक मैत्रीपूर्ण नाते तयार केले जाते. त्यानंतर काही दिवसांत त्या व्यक्तीला एका अज्ञातस्थळी डेटवर बोलावले जाते. ती व्यक्ती तिथे आल्यावर तिचे अपहरण करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात किंवा शरीर संबधांच्या बहाण्याने या व्यक्तींचे छुपे व्हिडिओ काढले जातात. त्यानंतर याच व्हिडिओच्या आधारे त्यांना धमकावून किंवा मारहाण करून लुटले जाते. अनेकदा तरुण-तरुणी बदनामीच्या भीतींने गप्प बसतात. त्यामुळेच असे प्रकार घडूनही कदाचित समोर आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
अशा घडल्या आहेत घटना…
पुण्यातही ग्रींडर ॲपद्वारे तरुणाचे अपहरण करून लुटण्याचा प्रकार समोर आले आहेत. ग्रींडर डेटिंग अॅपद्वारे ओळख वाढवून तरुणाला भेटण्यासाठी बोलावून त्याचे अपहरण करून लूटणाऱ्यांचा पुणे-ग्रामीण पोलिसांनी पदाफार्श केला होता. चार वर्षांपूर्वी नागपूरमध्येही या डेटिंग अॅपवरून संपर्क साधत एका तरुणावर प्राणघातक हल्ला करीत त्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्यात २१ वर्षीय तरुण थोडक्यात बचावला होता. दिल्लीत देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले होते. १५० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला होता.
एकांतात अनोळखी व्यक्तीला भेटने धोकादायक ठरू शकते. इंटरनेटवर जे दिसते ते तसे असतेच असे नाही. डेटिंग ॲपवर चॅटिंग करताना संबंधित व्यक्ती म्यूच्युल फ्रेंड यादीत आहे का, ते पाहावे. मोबाइल नंबर, फॅमिली फोटो किंवा वैयक्तिक फोटो शेअर करू नये.
– अॅड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील





