लोणावळा| खेळाचे मैदान भाड्याने देण्याची नगरपरिषदेला खरच गरज आहे का?

लोणावळा,(वार्ताहर) – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले एकमेव क्रीडांगण असलेले पुरंदरे मैदान हे लोणावळा नगरपरिषदेच्या मालकीचे आहे. मात्र नगरपरिषदेकडून हे मैदान मागील काही काळा पासून सातत्याने एक एक महिना भाडेतत्त्वावर देण्यात येत आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धेला हे मैदान हवे असल्यास उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे मैदान भाड्याने देण्याची नगरपरिषदेला खरच गरज आहे का, असा सवाल भाजपच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.
पुरंदरे मैदान एक महिना आनंद मेळ्यासाठी भाड्याने देण्यात आले होते. तो मेळा संपतो ना संपतो तोच सर्कसच्या कार्यक्रमासाठी पुढील संपूर्ण महिना भाड्याने दिले आहे. सध्या त्याठिकाणी सर्कससाठी तंबूसाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे मैदानाची दुर्दशा झाली आहे. हे खड्डे पुन्हा भरले तरी या मैदानाच्या पृष्ठभागावर जो नैसर्गिक टणकपणा होता तो निघून गेला असल्याने क्रीडा स्पर्धांसाठी हे मैदान कुचकामी ठरणार आहे.
शालेय क्रीडा स्पर्धा रद्द?
मैदानाच्या बाजूलाच असलेल्या पुरंदरे विद्यालयाचे विद्यार्थी खेळासाठी हे मैदान वापरत असतात. किंबहुना या शाळेच्या नावानेच हे मैदान ओळखले जाते. शाळेसाठी या मैदानाची जेंव्हा जेंव्हा आवश्यकता असेल तेंव्हा हे मैदान उपलब्ध करुन दिले जाईल असा एक सामंजस्य करार नगरपरिषद आणि विद्यालयात आहे. मात्र हे मैदान भाड्याने दिले जात असल्याने, विद्यार्थ्यांसाठी देखील हे मैदान उपलब्ध होत नाहीये. या वर्षी शाळेच्या वार्षिक क्रीडास्पर्धा देखील रद्द कराव्या लागणार असल्याचे येथील विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
लोणावळा शहर भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, सरचिटणीस शुभम मानकामे, बाबू संपत, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल होगले, व्यापारी आघाडीचे अभय पारख आणि भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मैदानावर जाऊन मैदानाची पाहणी केली. बेकायदेशीर खोदकाम करणाऱ्यांवर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. यासंबंधीचे एक निवेदन देखील मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
मैदान दुरावस्थेप्रकरणी मुख्याधिकारी ॲक्शन मोडमध्ये
पुरंदरे मैदानाच्या दुरवस्थेबाबत समजताच लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. हे मैदान भाड्याने देण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकारी मैदानाच्या दुरावस्थेला जबाबदार राहतील, असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला. यांना न मैदानावर खोदकाम करणाऱ्या व्यक्तींकडून घेतलेली साडेतीन लाखांची रक्कम मैदान पूर्वावस्थेत येत नाही तोवर देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहे.





