पुणे जिल्हा | लोणीकंदच्या पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी

वाघोली, (प्रतिनिधी) – वाघोली पोलीस चौकीच्या समोरच तरुणाने स्वतः पेटवून घेण्याच्या प्रकाराची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून, या प्रकरणानंतर लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची थेट उचलबांगडी केली आहे. त्याबरोबर एक सहायक पोलीस फौजदार आणि दोन हवालदारांना तडकाफडकी निलंबित केले आहे. दुसर्या एका प्रकरणात हडपसर पोलीस ठाणे अंकित मगरपट्टा चौकीत संशयातून कामगार महिलेला सहायक पोलीस निरीक्षक आणि महिला अंमलदारांनी केलेली शिवीगाळ, मारहाण प्रकरणात आता याही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंकित असलेल्या वाघोली पोलीस चौकीसमोरच तरूणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामुळे लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची तात्पुरत्या स्वरूपात बदली विशेष शाखेत करण्यात आली. तर त्यावेळी कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस फौजदार अशोक घेगडे, पोलीस हवालदार कैलास उगले व महेंद्र शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत हडपसर पोलीस ठाणे अंकित असलेल्या मगरपट्टा पोलीस चौकीत महिलेला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. त्याप्रकरणी हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी हे पत्र काढले आहेत. दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कामातील हलगर्जीपणा भोवल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गुन्हेगारांची परेड घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईला नुकतेच प्राधान्य दिले आहे. त्यानंतर पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी किंवा पोलीस अंमलदार यांच्या चुकांवरही दंडुका उगारला आहे.





