Ambegaon : लोणीत रंगला जंगी कलगीतुरा सामना; सवाल-जबाबातून ज्ञानाची मेजवानी
Ambegaon : आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे भव्य कलगीतुरा सामना रंगला. कलगीवाले-तुरेवाले यांच्या सवाल-जबाबाला रसिकांची मोठी दाद मिळाली.

Ambegaon : आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी बाजारतळ परिसरात रसिकांची मोठी गर्दी झाली होती.
शाहीर साहेबराव पवार व कंपनी, तुरेवाले (करंडी, ता. पारनेर) आणि शाहीर तान्हाजी माळवदकर व कंपनी, कलगीवाले (बेल्हे, ता. जुन्नर) यांच्यात रंगलेला सवाल-जबाबाचा सामना चांगलाच रंगला.
ढोलकी, टाळ, डफ, संबळ आणि तुणतुण्याच्या तालावर सादर झालेल्या या कलगीतुऱ्याने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. डफाची थाप, ढोलकीचा गगनभेदी आवाज आणि शाहिरांच्या पहाडी आवाजातील कवने यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
देशभक्ती, सर्वधर्मसमभाव, मातृ-पितृभक्ती तसेच विविध धार्मिक विषयांवरील सवाल-जबाबातून सामाजिक आणि वैचारिक संदेश देण्यात आला. काही भावनिक कवने ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
गणगौळण, रामायण, महाभारत, पुराणकथा, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल आणि लौकिक सवाल अशा विविध विषयांवर कलगीवाले आणि तुरेवाले यांच्यात रंगलेला सामना विशेष आकर्षण ठरला. पुणे जिल्ह्यासह नगर, नाशिक तसेच लोणी-धामणी परिसरातील श्रोत्यांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) देवदत्त निकम, संजय बडेकर, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, रवींद्र करंजखिले, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, संदीप पोखरकर, उद्धव लंके, बाळशिराम वाळुंज, प्रदीप दादा धुमाळ, संदीप आढाव, बबन भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, यावेळी स्वर्गीय शाहीर रामदास गुंड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रामदास गुंड हे वर्षानुवर्षे लोणी येथील कलगीतुऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर करत होते. उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.





