प्रभात वृत्तसेवा पुणे – बोपोडी येथील ऍग्रीकल्चर डेअरी या शासकीय संस्थेची जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करण्याची गंभीर अनियमितता केल्याप्रकरणी पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. शासकीय जमिनीचा अपहार झाल्याचा ठपका ठेवत, त्यांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आणि शासकीय अधिकाऱ्याला अशोभनीय असल्याची निरिक्षण शासनाने नोंदविले आहे. पुणे शहर तहसीलदार येवले यांनी बोपोडी येथील स. नं. ६२ चे ७/१२ सदरी ऍग्रीकल्चर डेअरीकडे, असे मालकी हक्कात शासकीय विभागाचे नाव असताना देखील जाणीवपूर्वक कायदेशीर व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अनाधिकाराने मालकी हक्काबाबत खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश जारी केले होते. या प्रकरणाची तक्रार मागील दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये पुणे शहर तहसीलदार येवले यांनी आदेश जारी करून ही जमीन खासगी व्यक्तीस प्रदान केल्याने शासकीय जमिनीचा अपहार केल्याचे समोर आले.येवले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार येवले यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने त्यांना शासन सेवेतून निलंबित करणे आवश्यक आहे, असे म्हणत महसूल विभागाने पुणे शहर तहसीलदार येवले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.