Loni Kalbhor News | तीन दिवस घर बंद ; दरवाजा तोडल्यावर आढळला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एकाचा राहत्या घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात घडली आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक डुंभडे (अंदाजे वय. 50) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. विकी शेंडकर यांची माळी मळा परिसरातील मारुती मंदिराजवळ एक इमारत आहे. शेडकर यांनी हॉटेलमध्ये काम करणार्या एका व्यक्तीला भाडेतत्त्वावर रूम भाड्याने दिली होती. शेंडकर यांच्या भाडेकरूकडे त्याचे नातेवाईक अशोक डुंभडे हे आले होते.
नातेवाईक घरी आहेत म्हणून शेंडकर यांचे भाडेकरू तीन दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. दोन दिवस झाले तरी घराचा दरवाजा उघडला नाही. आवाज दिला तरी कोणीही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेंडकर यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता, अशोक डुंभडे यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला.





