Loni Kalbhor Crime : तुझे फोटो व्हायरल करीन! बारावीच्या विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल
Loni Kalbhor Crime : सतत येणाऱ्या फोन कॉल्समुळे आईला संशय आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड; पीडितेच्या आईच्या फिर्यादीनंतर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल.

Loni Kalbhor Crime – सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुला विरोधात पॉक्सोसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुलगी फोनवर वारंवार बोलत असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीची आणि मुलाची शालेय शिक्षणादरम्यान ओळख झाली होती. इयत्ता सहावी ते आठवीदरम्यान दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यानंतर संपर्क तुटला होता. मे २०२५ मध्ये बारावीच्या उन्हाळी शिकवणी दरम्यान मुलाने मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधला.
“तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत,” असे सांगून त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. सुरुवातीला मुलीने दुर्लक्ष केले; मात्र, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ती घाबरली व त्याला भेटली. त्याने मुलीला शेवाळवाडी, हडपसर येथील एका लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तसेच फोटो व्हायरल करण्याची भीती घालून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर अनेक वेळा त्याने लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
याच काळात तो मुलीला सतत फोन व मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. अखेर मुलगी फोनवर बोलताना आईला संशय आल्याने तिने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी संपूर्ण प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.





