नीरव मोदीच्या आत्महत्येच्या शक्यतेबाबत लंडन न्यायालयात सुनावणी

लंडन – पंजाब नॅशनल बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नीरव मोदी याच्या संदर्भात लंडनमधील उच्च न्यायालयात मंगळवारपासून एका सुनावणीला सुरुवात झाली. भारतात प्रत्यार्पण केले जाण्याच्या शक्यतेच्या भीतीपोटी नीरव मोदी आत्महत्या करण्याची भीती दोन मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या भीतीमागील पुरावे या सुनावणीदरम्यान तपासले जाणार आहेत.
नीरव मोदी याला नैराश्याने ग्रासले असून त्याचे पर्यावसन आत्महत्या करण्यामध्ये होऊ शकते, अशी भीती ऍन्ड्रयू फॉरेस्टर आणि सीना फेजल या दोन मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या दोघांनी लंडनमधील वॅन्डसवर्थ तुरुंगात नीरव मोदीची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निरीक्षण नोंदवले आहे.
जर भारतात प्रत्यार्पण केले गेले तर आत्महत्या करण्याचे विचार नीरव मोदीच्या मनात असल्याचे या दोघांनी म्हटले आहे. मानसिक आरोग्य किंवा मानवाधिकारांच्या मुद्यावर नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रियेला थांबवले जावे का याबाबत न्यायालयाकडून या आठवड्यात अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे.





