पिंपरी | मान्सून पर्यटनासाठी लोणावळा पोलिस सज्ज !

लोणावळा, (वार्ताहर) – पावसाळा, लोणावळा आणि पर्यटन हे अतुट नाते आहे. पावसाळा म्हटलं की पर्यटन आणि पर्यटन म्हटलं की लोणावळा ही नागरिकांची पहिली पसंती असते. दरवर्षी पावसाळी पर्यटनासाठी लाखो पर्यटक लोणावळा शहरात येतात.
त्यामुळे पर्यटकांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनालाही अलर्ट राहावे लागते. त्याच पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी ‘मान्सून’ पर्यटनाचे नियोजन केले असून पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा पोलिस सज्ज असल्याचे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
प्रमुख समस्या कोणत्या?
लोणावळा शहर आणि भागातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांमुळे लाखो पर्यटक लोणावळा नगरीत येतात. त्यामुळे आपसूकच येथील व्यवस्थापनाची आणि सोयी-सुविधांची सर्वाधिक चर्चा होते. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न नगरपरिषद करत असून त्यामुळेच येथे पर्यटकांचा ओढा वाढतोय, असे नगर परिषद प्रशासनाने म्हटलंय.
दुसरीकडे मात्र लोणावळा शहर आणि परिसरात होणारी वाहतूक कोंडी, हुल्लडबाजी, नशापान करून दंगा करणारे पर्यटक, हॉटेल-रिसॉर्टमध्ये चालणारे अवैध धंदे, बंगलो ठिकाणची असुरक्षितता असे अनेक विषय समस्या म्हणून कायम आहेत. या गोष्टी दरवर्षी पर्यटनावर परिणाम करतात.
वरील समस्या लक्षात घेऊन लोणावळा पोलिसांनी मागील वर्षापासून मान्सूनच्या अनुषंगाने खास नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण हद्दीत विविध समस्यांवर उपाययोजना करून त्याची चोख अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे.
नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : सत्यसाई कार्तिक
लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी काही सूचना पारित केल्या आहेत. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या उपस्थितीत माध्यमांशी बोलताना कार्तिक यांनी ही माहिती दिली.
तसेच, पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयपीएस सत्यसाई कार्तिक आणि पोलिस निरीक्षक सुहास जगतात यांनी केले आहे.
लोणावळा पोलिसांचे खास मान्सून नियोजन –
१) पावसाळी पर्यटन काळात प्रत्येक विकेंडला १०० पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लोणावळा शहरात तैनात करणार. होमगार्ड देखील तैनात करणार.
२) वाहतूक नियोजनासाठी लोणावळा पोलीस स्वयंसेवक दलाची मदत घेणार. १०० स्वयंसेवकांना त्यादृष्टीने लोणावळा पोलीस आणि वाहतूक शाखेच्या मदतीने प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
३) आयआरबी, एमएसआरडीसी आणि लोणावळा नगरपरिषद यांच्यासह संयुक्त सर्वे करून वाहतूक नियोजनाच्या संदर्भात उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
४) नगर परिषदेच्या मदतीने लोणावळा शहरात इंद्रायणी नदी पूल भांगरवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून शहरात सम-विषम पार्किंगचे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे.
५) आयआरबी आणि एमएसआरडीसी यांच्याशी चर्चा करून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेले अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात तसेच हातगाड्या आणि बॅनर्सलर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
६) भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला असून त्यासंदर्भात नगरपरिषदेच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे.
७) जिथे सातत्याने वाहतूक कोंडी होते, असे पॉईंट शोधून त्याठिकाणी स्पीकर सिस्टीम बसवून ते पॉईंट पोलीस नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे.
८) सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन किंवा विनाकारण हुल्लडबाजी करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करणार.
९) रस्त्यावर कुठेही वाहने उभी करून किंवा नो एन्ट्री मध्ये प्रवेश करून वाहतूक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरणारी वाहने उचलून घेण्यासाठी टोईंग व्हॅनची व्यवस्था केली आहे.





