Lonavala Crime | पुलाखाली सुरू होता जुगार ; पोलिसांचा छापा, १३ जण अटकेत
प्रभात वृत्तसेवा
लोणावळा – शहर पोलिसांनी वलवण येथील पुलाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत १३ जणांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी आणि कार असा एकूण ५,८९,०३०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन खाजगी वाहनाने घटनास्थळी पाहणी केली. खात्री झाल्यानंतर दुपारी ५ वाजेदरम्यान अचानक छापा टाकण्यात आला. त्यावेळी काही व्यक्ती पत्ते मांडून पैशांचा जुगार खेळताना आढळले.
यावेळी अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुरुदेवसिंग किशनसिंग, विठ्ठल दुर्गाअप्पा बंडगर, मोहन मंजुळे, दिलीप शिंदे, संदीप ठोंबरे, विशाल सुरेश पाळेकर, सुनील खांडेभरड, तुकाराम येवले, संतोष येवले, किसन मेने, सीताराम खांडेभरड, विनोद घारे आणि नीरजसिंग माताप्रसाद विमल या १३ जणांचा समावेश आहे.या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सर्वाधिक २,१३,९७०/- रुपये तुकाराम येवले याच्याकडे, तर १,१०,५००/- रुपये सुनील खांडेभरड याच्याकडे आढळले. प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





