Lok Sabha Election 2024 । यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर सर्वांचेच लक्ष लागले असून निवडणुक अधिक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय अशी निवडणूक होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून आज सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुनंदा पवार अशा चौघांनी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. अशात आज पुणे येथे सुनेत्रा पवार यांनी प्रचारार्थ महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी यावेळी अबकी बार सुनेत्राताई पवार अस म्हणत घोषणा दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले,’व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे. मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यासपीठावर आते मजबूत माणसं आहेत की, 10-12 लाख मते अगदी सहज मिळतील, आणि ते बरोबर आहे. हे लोक सुनेत्रा ताईंना दिल्लीला नक्कीच पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण इथे पाहत आहे. आज खऱ्या अर्थाने बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.’
ते पुढे म्हणाले,’ बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. बारामतीची लढाई ही ऐतिहासिक लढाई असली तरी ही वैयक्तिक लढाई नाही. ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे.’ असेही ते यावेळी म्हणाले आहे.