छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections in Chhatrapati Sambhaji Nagar) प्रचार शिगेला पोहोचला आहे. सोमवारी 13 मे ला या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज शनिवारी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या (Mahayuti) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. ज्यानंतर शहरातील मुख्य चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरात शनिवारी (ता. 11 मे) सकाळी 10 वाजता चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरी काढण्यात येणार होती. शहरातील प्रमुख ठिकाण असलेल्या क्रांती चौकातून ही प्रचार फेरी निघणार होती. परंतु, या प्रचार फेरीला उशीर झाल्याने त्या ठिकाणी काही वेळानंतर महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे कार्यकर्ते जमू लागले. पण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. पण यावेळी तिथे मनसेचे कार्यकर्तेही असल्याने “उठ दुपारी, घे सुपारी…, मनसे आणि दोनशे” अशा प्रकारच्या घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. ज्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान, ही घटना घडली. दरम्यान, छ. संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यात लोकसभेची लढत होत आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. नुकतंच राज ठाकरे यांची पुण्यात सभा पार पडली. त्यानंतर आज संभाजीनगरच्या क्रांती चौकात दोन्ही उमेदवारांचे समर्थक आमने सामने आले. यावेळी मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येंने उपस्थित होते.