Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी आपची जोरदार तयारी.. दिल्लीतील चार उमेदवार जाहीर

Lok Sabha Election 2024 : एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर इडीमुळे अटकेची टांगती तलवार आहे. अशात आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीतील आपल्या चारही उमेदवारांच्या नावाची आज घोषणा केली. त्यानुसार नवी दिल्ली येथून सोमनाथ भारती यांना, दक्षिण दिल्लीतून सहि राम पहेलवान यांना, पूर्व दिल्लीतून कुलदीप कुमार तर पश्चिम दिल्लीतून महाबळ मिश्रा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे नेते संदीप पाठक म्हणाले की आम आदमी पार्टी विरोधकांच्या इंडिया आघाडीचा घटकपक्ष आहे. आम्ही पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा आज करतो आहोत.
यात दिल्लीतील चारही जणांच्या नावांचा समावेश आहे. पाचवा उमेदवार दिल्ली लगतच्या हरियाणा राज्यातील आहे. येथे पक्षाने कुरूक्षेत्र येथून राज्यसभेचे माजी खासदार आणि हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.
केजरीवाल पुन्हा ईडीसमोर गैरहजर
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल सोमवारी सातव्यांदा ईडीसमोर गैरहजर राहिले. न्यायालयाने आदेश दिल्यास ईडीपुढे हजर राहू, अशी भूमिका त्यांनी मांडली. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीला केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. त्यासाठी त्या केंद्रीय यंत्रणेने सहावेळा समन्स बजावूनही केजरीवाल हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना सातव्यांदा समन्स बजावण्यात आले.





