Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत ही आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासोबत होणार आहे. या दरम्यान प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना एक पत्र लिहीत सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमचे स्वागत असल्याचे म्हटले होते.
या माध्यमातून आमदार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना परका उमेदवार दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सातपुते यांनी देखील पत्राला प्रत्राने उत्तर दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजात धर्म, जातीपातीत फूट पडून कोणी एवढे वर्ष राजकारण केले, हे सोलापूरच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेने आता ओळखले असल्याचे राम सातपुते यांनी म्हटले आहे. दोन्ही तरुण नेत्यांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय उर्जामंत्री, अशा अनेक पदावर कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. मात्र तुलनेत राम सातपुते यांना कोणताही राजकीय वारसा नसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात पाऊल टाकले आहे.
कोण आहेत राम सातपुते ?
राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं. 36 वर्षीय राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातील डोईठाण (ता. आष्टी) येथील आहेत. वडील ऊसतोड कामगार होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब माळशिरससारख्या ऊस पट्ट्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. राम सातपुते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचे काम केले.
2015 च्या दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांना अटक झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे समर्थन केलं होतं. या पार्श्वभूमीवर राम सातपुते आणि इतर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठे आंदोलन केलं. त्यानंतर सातपुते चर्चेत आले होते. अ. भा. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री आणि भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळत असताना मागील 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना माळशिरस राखीव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा 2702 मतांनी पराभव करत विजय मिळवला. सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.
दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते म्हणाले, “सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. ‘सच्च्या कार्यकर्त्यांना संधी’ हे माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे आणि हे तत्त्व पक्ष काटेकोरपणे पाळतो, याचा खरोखर अभिमान वाटतो.”