Newasa : दोन घासांसाठी आजही भटकंती; लोहार-घिसाडी समाज सरकारी योजनांपासून वंचित
Newasa : नेवासे येथे लोहार-घिसाडी या भटक्या समाजाच्या कुटुंबांचे विदारक वास्तव समोर आले आहे. अनेकांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नसून सरकारी योजनांचाही लाभ मिळत नसल्याचे वास्तव 'दैनिक प्रभात'च्या पाहणीत उघड झाले.

Newasa : देश प्रगत राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना दुसरीकडे भटके-विमुक्त जमातीतील लोहार-घिसाडी समाजातील अनेक कुटुंबे आजही दोन वेळच्या अन्नासाठी गावोगावी भटकंती करत असल्याचे विदारक वास्तव आहे. आधुनिक यंत्रसामग्रीमुळे पारंपरिक व्यवसायाला मोठा फटका बसल्याने या समाजासमोर उपजीविकेचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. त्यातच अनेक कुटुंबे सरकारी योजनांच्या लाभापासूनही वंचित असल्याचे वास्तव ‘दैनिक प्रभात’च्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले.
नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात रस्त्याच्या कडेला तात्पुरता संसार थाटून राहणाऱ्या लोहार-घिसाडी समाजातील एका कुटुंबाची ‘दैनिक प्रभात’ने प्रत्यक्ष भेट घेतली. रस्त्यालगतच लोखंड तापवून कुदळ, खुरपी, कोयता यांसारखी शेतीची अवजारे तयार करणे, त्याच ठिकाणी त्यांची विक्री करणे आणि बाजूलाच भात्यावर स्वयंपाक करून संसार चालवणे, अशी त्यांची दैनंदिन जीवनशैली असल्याचे पाहायला मिळाले.
पारंपरिक व्यवसायावर आधुनिकतेचा फटका –
पिढ्यानपिढ्या लोखंडी अवजारे तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाच्या व्यवसायावर आधुनिक यंत्रसामग्रीमुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पन्न घटले असून अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोज नवीन गाव, नवीन मुक्काम अशी भटकंती सुरू असल्याने त्यांचे स्थिर जीवन आजही स्वप्नच ठरले आहे.
आधारकार्ड, रेशनकार्डही नाही; मुलांचे शिक्षण अर्धवट –
प्रत्यक्ष पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही कुटुंबांकडे आजही आधारकार्ड आणि रेशनकार्ड नाही. काही मुले शाळेबाहेर असून निरक्षरतेचे प्रमाणही मोठे आहे. अनेक मुलींची अल्पवयातच लग्ने होत असल्याचेही दिसून आले. त्यांचे पतीही वयाने मोठे असल्याची माहिती समोर आली.
कुटुंबातील अपंग व्यक्तींनाही संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव या भेटीदरम्यान स्पष्ट झाले.
सरकारी यंत्रणा नेमकी करते तरी काय?
दररोज मुक्काम बदलत असल्यामुळे या समाजापर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या योजनांचे आकडे कागदोपत्री मोठे असले तरी प्रत्यक्षात मात्र भटक्या कुटुंबांची साधी विचारपूसही होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथील हे कुटुंब सध्या नेवासा येथे वास्तव्यास असून शेतीची अवजारे तयार करून त्यांची विक्री करत उदरनिर्वाह करत आहे. दिवस संपला की त्याच ठिकाणी स्वयंपाक, मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच संघर्षाची सुरुवात, अशी त्यांची जीवनकहाणी आहे.
या वास्तवातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतो आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
वास्तव पाहणीनंतर मदतीचा हात –
लोहार-घिसाडी, तारेवरील कसरतीचे खेळ करणारे तसेच काही भिक्षुक समाजातील अनेक कुटुंबांना आजही सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव समोर आले. या पार्श्वभूमीवर भेंडा (ता. नेवासा) येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क विभागातील बाळासाहेब अरगडे यांनी संबंधित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी तसेच सर्वांचे आधारकार्ड व रेशनकार्ड काढून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या शब्दांनी कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.





