करोनाबाधित वाढले, मात्र बेड वाढलेच नाहीत
पुढील आठवड्यात स्थिती आणखी गंभीर होणार
पुणे – कोणतीही पूर्वतयारी न करता शहर लॉकडाऊन करण्यात आले. पण, हा निर्णय आता “बुमरॅंग’ ठरण्याची चिन्हे आहेत. नव्याने वाढणारे बाधित, 100 टक्के ट्रेसिंग तसेच संशयितांच्या चाचण्या करण्याचे नियोजन निर्णय घेताना करण्यात आले. त्यामुळे आता चाचण्या वाढल्याने करोना बाधितांची संख्या पालिकेच्या अपेक्षेपेक्षा वेगाने वाढली आहे. या बाधितांना ठेवायचे कोठे? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. त्यातच, खासगी हॉस्पिटल महापालिकेस दाद देत नसल्याने त्यांच्याकडील बेड नियंत्रित करण्याचा आदेश देऊनही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या दररोज किमान 25 ते 30 गंभीर करोनाबाधित बेड मिळण्यासाठी वेटिंगवर आहेत.
लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी शहरात बेड्सची सुविधा, चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्ण वाढल्यावर खासगी हॉस्पिटल्सचे नेमके किती बेड वापरता येतील, रुग्ण वाढल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 100 टक्के व्यक्तींच्या चाचण्या कशा करता येतील, याचा कोणताही कृती आराखडा महापालिका प्रशासनाने केला नाही. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे लॉकडाऊनच्या एक दिवस आधी नवीन आयुक्त रुजू झाले. लॉकडाऊनचे पहिले पाच दिवस संपत आले, तरी ते अद्याप शहराचा आढावा आणि शासनाला अहवाल देण्याच्या बैठकांत व्यस्त आहे. सोबतच करोना बाधितांच्या वाढलेल्या संख्येचे खापर आरोग्य विभागावरच फोडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी कालबद्ध कृती आराखडा का करण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
20 जुलैनंतर स्थिती गंभीर होणार?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलैनंतर शहरातील ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पालिकेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 20 जुलैपर्यंत शहरातील करोनाबाधितांचा एकूण आकडा सुमारे 37 हजारांवर, तर त्यातील सक्रिय बाधित सुमारे 16 हजार असतील. या रुग्णांसाठी 15 हजार 128 ऑक्सिजनविरहित बेडची आवश्यकता असेल; तर 2,836 ऑक्सिजन बेडची आवश्यकता असेल. सोबतच 946 आयसीयू आणि 250 व्हेंटिलेटर्सची गरज भासेल. मात्र, प्रत्यक्षात 16 जुलैअखेर पालिकेकडे 11,170 बेड, 1,861 ऑक्सिजन बेड, 400 आयसीयू बेड तर 231 व्हेंटिलेटरची सुविधा आहे. त्यानंतरही लॉकडाऊनचा परिणाम गृहीत धरल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास आणखी आठ दिवस लागतील.
दोन दिवसांत भरताहेत कोविड केअर सेंटर
शहरात प्रत्येक तीन दिवसांनंतर सुमारे 1 हजार ते 1,500 क्षमतेची कोविड केअर सेंटर पालिका सुरू करत आहे. मात्र, सध्या शहरात वाढलेल्या बाधितांचा आकडा पाहता काही सेंटर दिवसभरातच, काही दोन दिवसांत “ओव्हरफ्लो’ होत आहेत. पालिकेस दिवसाआड नवीन कोविड सेंटर उभारावे लागत आहे.