Local body Elections : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माण-खटावची धुरा जगताप यांच्यावर

प्रभात वृत्तसेवा
दहिवडी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) यांची माण-खटाव तालुक्याची पूर्ण धुरा अभयसिंह जगताप यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.जगताप म्हणाले, “ शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माण-खटाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मोट बांधण्याच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
त्यानुसार मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच भाजपविरोधी विचारांचे सर्व संघटन-नेते यांना एकत्र आणून महाविकास आघाडी मजबूत करणार आहे.जगताप यांनी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढणार असल्याच्या अफवांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले. “कोणत्याही परिस्थितीत आम्ही अजित पवार गट किंवा महायुतीच्या घटक पक्षांशी युती करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जिल्हा परिषदेच्या कुकुडवाड गटातून आरक्षण खुला झाल्याने ते स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.ग्रामविकासमंत्र्यांवर टीका करताना जगताप म्हणाले, “माण तालुक्यात अपेक्षित असा विकास झाला नाही. आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा यांसारख्या विषयांकडे ग्रामविकास मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. सामान्य जनता आणि पत्रकार यांना धमक्या देणे बंद करावे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.





