नागपूर : शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर थेट हल्लाबोल करीत कर्जमाफीचे आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता, असे म्हटले. शेतक-यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिले. सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधा-यांना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसत आहे. अजित पवार यांनी मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीचा उल्लेख केला नाही, असे वक्तव्य केले. यावरून यांची खरी नियत लक्षात येते, असा आरोपही त्यांनी केला. महायुतीचे सरकार आल्यावर शेतक-यांची कर्जमाफी करू, असा जाहीरनाम्यात भाजपने स्पष्टपणे उल्लेख केला होता. आता सरकार म्हणून अजित पवार यांचीसुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्या बळीराजाला कर्जमुक्त करुन आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकतेच मी कर्जमाफीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. महायुतीतील भाजपमधील अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का? ….अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे म्हणत हातवर केले आहेत. दरम्यान, सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन महिने होत आहेत. मात्र शेतकरी कर्जमाफीवर सरकारने चकार शब्द देखील काढलेला नाही. यावरून विरोधकांनी सरकारला आता घेरण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील १ कोटी २१ लाख शेतक-यांना मदत मिळत होती. आता ती संख्या ८१ लाखांवर आणली गेली आहे. जवळपास ४० लाख शेतक-यांना सरकारने कात्री लावली आहे. तर येणा-या काळात देखील लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतही हेच होणार आहे. – अंबादास दानवे, ठाकरेसेनेचे आमदार