Jayant Patil : कर्जमाफी अन् एकरी 50 हजार द्या; केंद्राची वाट न पाहता तिजोरी रिकामी करा, जयंत पाटील

jayant patil : महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टी व पुराने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारला जोरदार इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्याची तिजोरी रिकामी करून पूरग्रस्तांना तात्काळ भरीव मदत द्यावी, अशी मागणी करताना जयंत पाटील यांनी केली आहे.
केंद्रातील सरकार आता आपलेच आहे, त्यामुळे विलंब न करता कर्जमाफी जाहीर करा. एनडीआरएफचे जुने निकष महागाई व संकटाच्या तीव्रतेला साजेसे नाहीत. सांगलीत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हताशेपणाकडे लक्ष वेधले आणि ‘वेट ड्रॉट’ घोषित करून एकरी ५० हजारांची मदत, कर्जमाफी आणि रबी हंगामासाठी मोफत बियाणे-खते द्या, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
६० लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त
मागील काही दिवसांत महाराष्ट्रात पडलेल्या संततधार पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतीला मोठा धक्का बसला आहे. सुमारे ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, ३० लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले आहेत. पिके नष्ट, माती वाहून गेली, पशुधन गमावले आणि घरे कोसळली आहेत. पाटील यांनी बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. “शेतकरी डोळ्यात अश्रू धारावून आपले नुकसान पाहत आहेत. पंचनामा प्रक्रियेत त्यांना आणखी त्रास देऊ नका, थेट भरपाई द्या, असं पाटील यांनी म्हंटले आहे.
एकरी ५० हजार आणि पूर्ण कर्जमाफी, पाटीलांची मागणी
जयंत पाटील म्हणाले, १० ते १५ हजार रुपये तरी तात्काळ द्या, पण खरी गरज एकरी ५० हजारांची थेट मदत आहे. जिथे जमीन वाहून गेली, तिथे दोन लाखांपर्यंत द्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘योग्य वेळी कर्जमाफी’ म्हटले होते. आता यापेक्षा चांगली वेळ कधी येईल? निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, तर शेतकरी संकटात असताना द्या. यामुळे आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा उभे राहील. एनडीआरएफ निकष जुने झाल्याने केंद्राकडून २० हजार कोटींची मदत आणि राज्याने ‘वेट ड्रॉट’ घोषित करून कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणीही जयंत पाटलांनी केली.
केंद्राची वाट न पाहता राज्य तिजोरी उघडा
केंद्राची मदत येईल तेव्हा येईल, पण राज्य सरकारने विलंब करू नये. केंद्रातील सरकार आता आपलेच आहे, त्यामुळे तिजोरी रिकामी करा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून विशेष तीन दिवसांच्या अधिवेशनाची मागणी केली असून, तिथे नुकसानभरपाई, मदत पॅकेज आणि कर्जमाफीवर चर्चा व्हावी, असंही जयंत पाटील यांनी म्हटले.




