आणखी एका स्टार फुटबॉलपटूला कोरोनाची लागण

नवी दिल्ली – फुटबाॅलविश्वातील आणखी एका स्टार फुटबॉलपटूला कोरोनाची लागण झाली आहे. लिव्हरपूल फुटबॉल क्लबकडून खेळणारा इजिप्तशियन (मिस्र) स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाह हा कोरोना पाॅझिटिव्ह आढळला आहे.
आफ्रिका कप ऑफ नेशन्स टू-लेग स्पर्धेच्या पात्रता सामन्यांसाठी सलाह मिस्र या आपल्या राष्ट्रीय संघासह आंतरराष्ट्रीय दौर्यावर होता. येथे तो टोगोविरुद्धच्या सामन्यात भाग घेणार होता. पण आता या 28 वर्षीय खेळाडूला विलगीकरणात रहावे लागणार आहे.
शुक्रवारी इजिप्तशियन(मिस्र) फुटबॉल असोसिएशनच्या वतीने याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांनी म्हटले आहे की, सलाह यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे, परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळली नाहीत.
दरम्यान, सलाह यांच्या आणखी काही चाचण्या केल्या जातील. त्यामुळे सलाह लिव्हरपूलकडून प्रीमियर लीगमध्ये काही सामने खेळू शकणार नाही. मोहम्मद सलाह यांच्याआधी रोनाल्डो, थियागो, सदियो माने आणि जेरदान शकीरी यांनाही कोरोनाची लागण झाली होती.




