धक्कादायक! लिव्ह इन पार्टनरच्या शवाचे केले 35 तुकडे, आरोपी पाच महिन्यांनंतर पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली – दिल्लीत पाच महिन्यांपूर्वी लिव्ह इन पार्टनर श्रध्दा वाकर हीची हत्या करून तिचा मृतदेह गायब केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आफताब आमीन पुनावाला याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचा शोध घेतला जातो आहे. 28 वर्षांचा आरोपी मुंबईचा रहिवासी आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने श्रध्दाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते व दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत त्यांची विल्हेवाट लावली होती.
श्रध्दाचे वडिल विकास मदान वाकर यांनी 8 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. 26 वर्षीय श्रध्दा मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तेथेच तिची आफताब आमीन याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. घरच्यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी या नात्याला विरोध केला. त्यानंतर या दोघांनी अचानक मुंबई सोडली. दिल्लीच्या महरौलीच्या छतरपूर भागात ते राहत होते. दरम्यानच्या काळात श्रध्दाचा फोन बंद असल्याचे तिला फोन करणाऱ्यांना आढळून येत होते.
श्रध्दाचे कुटुंबीय पालघर येथे राहतात. ती महरौलीत जेथे भाड्याने राहत होती तेथे तिचे वडिल पोहोचले तेव्हा त्यांना खोलीचे दार बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली व पोलिसांनी आफताबला शनिवारी अटक केली. अगोदर त्याने ती येथे राहत नाही असेच सांगितले. मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली.
अशी केली हत्या
श्रध्दाने आफताबकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता व त्यावरून त्यांच्यात भांडणे होत होती. 18 मे रोजीही भांडण झाले. त्यानंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले व ते वेगवेगळ्या भागात फेकून दिले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री दोन वाजता त्याच्या फ्लॅटमधून बाहेर पडायचा आणि वेगवेगळ्या भागांत ते फेकत होता. असे त्याने 18 दिवस केले. त्याने मृतदेह ठेवण्यासाठी मोठा फ्रिज विकत घेतला होता. त्याने शेफ बनण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्या ज्ञानाचा वापर त्याने श्रध्दाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला. दरम्यान, पोलिसांना काही तुकडे सापडले आहेत. मात्र ते मानवी शरिराचे आहेत की नाही याची खात्री नाही.



