“ऐका, तुम्ही आधी पक्षाचे नाव नीट घ्या..”; श्रीकांत शिंदे पत्रकारांवर भडकले

अयोध्या – गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे, मग ते एकनाथ शिंदे यांचं बंड त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणं आणि पुन्हा नव्याने शिंदे भाजप सरकार स्थापन होणं. हा सर्व क्रम पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.
अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपा नेते अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाकडून सतत टीका केली जात आहे. अयोध्या येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पत्रकारावर भडकल्याचे दिसून आले.
नेमकं काय घडल? –
दरम्यान, श्रीकांत शिंदे पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, “शिवसेनेनं अशी टीका केली आहे की, भाजपाने एकनाथ शिंदे यांना हायजॅक केलंय, भाजपाच्या पैशावर हा अयोध्येचा तमाशा सुरू आहे”, या उद्धव ठाकरे गटाकडून केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता श्रीकांत शिंदे म्हणाले, “मला वाटतं तुम्ही पक्षाचं नाव नीट घेतलं पाहिजे. आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग प्रश्न विचारा…” असे म्हणत पत्रकारावर भडकल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याबरोबर असलेले सर्व मंत्री आणि आमदारांनी देखील रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. राम प्रभुचं दर्शनं घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करु असे शिंदे म्हणाले.





