New Rules: आजपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? वाचा

Key money updates in 2025: आजपासून नववर्षाला सुरूवात झाली आहे. या वर्षात तुम्ही काही आर्थिक संकल्प नक्कीच केले असतील. मात्र, 1 जानेवारी 2025 म्हणजेच आजपासून काही नियमांमध्ये बदल होणार असून, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर होऊ शकतो. आजपासून बदलणाऱ्या अशाच काही प्रमुख नियमांविषयी जाणून घेऊया.
एलपीजी किंमत
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून एलपीजी सिलेंडरची किंमत 14.50 रुपयांनी कमी होणार आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत झाली आहे. घरगुती वापराच्या 14 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत.
UPI 123Pay च्या नियम
आरबीआयने फीचर फोनच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा देण्यासाठी UPI 123Pay सुरू केले होते. आतापर्यंत या माध्यमातून 5 हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठवता येत असे. मात्र, आता 1 जानेवारी 2025 पासून 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार याद्वारे करता येतील.
शेअर मार्केटशी संबंधित नियम
सेंसेक्स, सेंसेक्स-50 आणि बँकेक्सच्या कॉन्ट्रॅक्ट्सच्या मासिक एक्सपायरीमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत या इंडेक्सची एक्सपायरी शुक्रवारी होत असे. मात्र, आता मंगळवारी एक्सपायरी होईल. तसेच, तिमाही आणि सहामाही कॉन्ट्रॅक्ट्सची एक्सपायरी शेवटची मंगळवारी होईल. Nifty 50 मासिक कॉन्ट्रॅक्ट्सची एक्सपायरी गुरुवारी होते.
बँक खाती होणार बंद
आरबीआयने बँक खात्यांसंदर्भात नवीन नियम जारी केले आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार गेली अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेली आणि शून्य शिल्लक असलेली बँक खाती बंद केली जातील. 1 जानेवारी 2025 पासून हा नियम लागू होईल. यामुळे देशातील लाखो बँक खाती बंद होण्याची शक्यता आहे.
जीएसटी संदर्भातील नियम
जीएसटी संदर्भातील नियमात देखील नववर्षात बदल होणार आहे. 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक टर्नओव्हर असणाऱ्या व्यावसायिकांसाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू होणार आहे. तर 5 कोटींपेक्षा अधिक टर्नओव्हर असणाऱ्यांसाठी हा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल.
शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त कर्ज
आतापर्यंत शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळत असे. आरबीआयने आता या रक्कमेत वाढ केली आहे. शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकेल.
कारच्या किंमती वाढणार
1 जानेवारी 2025 पासून कारच्या किंमती वाढणार आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंडाई आणि टोयोटा सारख्या कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत 2 ते 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.




