राज्यात ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंदच !

मुंबई: राज्यात सोमवारपासून काही भागात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यातच काही दुकानाचाही समावेश करण्यात आला होता.मात्र यात मद्याच्या दुकानांचा समावेश करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात येत होती परंतु, मुंबईत लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. जिल्हाधाकिरी राजीव निवतकर यांनी यासंबंधी स्पष्ट माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे योग्य पालन केले तर मद्यविक्रीची दुकाने सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. मात्र जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत लागू असणार असल्याचे सांगितले आहे.
जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे की, “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री ३० एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता”. मात्र लॉकडाउनचा कालावाधी वाढवण्यात आला असल्याने मद्यविक्री ३ मे २०२० पर्यंत पूर्ण दिवस बंद राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीवर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.





