लिओनेल मेस्सी दोन महिने निलंबित

ब्युनोस आयर्स -अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू वपॅरिक सेंट जर्मेनचा स्ट्रायकर लिओनेल मेस्सी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. क्लबची परवानगी न घेता पत्नीसह फिरायला गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे क्लबने जाहीर केले.
मेस्सीने दोन दिवस सामने नसल्याने आपल्या पत्नी व मुलांसह सौदी अरेबिया गाठले व तेथे सुट्टी घालवली. मात्र, या दोन दिवसांच्या सुट्टीत त्याने क्लबच्या सरावाला उपस्थित राहणे गरजेचे होते मात्र, त्याने कोणतीही कल्पना न देता या सरावातून अंग काढून घेतले. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.
मेस्सीला या निलंबनाच्या कालावधीत सामना खेळता येणार नसून क्लबच्या सरावातही सहभागी होता येणार नाही. तसेच या कालावधीसाठी त्याचे मानधनही त्याला मिळणार नाही, असेही क्लबने सांगितले आहे. गेल्याच आठवड्यात त्याचा सहभाग असतानाही त्याच्या पॅरिस सेंट जर्मेन संघाला लीग 1 स्पर्धेत लॉरिएंटकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला होता व त्याचवेळी क्लबने सगळ्याच खेळाडूंसाठी सराव बंधनकारक केला होता.





