Rohit Pawar : ‘कर्णासारखं मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला…’; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar : या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आता पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

Rohit Pawar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आता पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना का वाचवत आहेत, असा सवाल केला आहे.
‘कर्णासारखं मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका,’ असे म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. MPSC औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीचे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणात आपण स्वतः शंभरहून अधिक नावे दिली होती, मात्र आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
#MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेत पेपर फोडणारे रॅकेट राज्यभर असून, आम्ही स्वतः शंभरहून अधिक नावं दिली होती. परंतु आयोगाने मात्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी एकजुटीचा परिणाम दिसत असून, अखेर आज आणखी चार घोटाळेबाजांना अटक झाली आहे. सुरुवातीला एकाच उमेदवाराला फायदा झाल्याचं सांगणारे भ्रष्ट अध्यक्ष आज पुन्हा उघडे पडले आहेत. सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्ट अध्यक्षांचा क्रूर चेहरा समोर आणूच!
विशेष म्हणजे, आज अटक झालेले दोन उमेदवार COMBINE 2025 MAINS च्या मेरिट लिस्टमध्ये देखील आहेत. हा गोंधळ खूप मोठा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तत्काळ आयोग बरखास्त करून क्लीनअप करा. विषय गंभीर आहे. कर्णासारखं मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका!
@Dev_Fadnavis
@mpsc_office#MPSC #PeperLeak #पेपरफुटी
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 25, 2026
‘आणखी चार जणांना अटक, आरोपींची संख्या ११ वर’
या प्रकरणात काल आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे. मुख्य आरोपींकडून प्रश्नपत्रिका मिळवून ती उमेदवारांना देत आर्थिक फायदा मिळवल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा परिणाम दिसून येत असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला केवळ एका उमेदवाराला फायदा झाल्याचे सांगितले जात होते, मात्र आता झालेल्या अटकसत्रामुळे प्रकरणाचे स्वरूप अधिक व्यापक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘आयोग बरखास्त करून क्लीनअप करा’
रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयोगाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. आयोग बरखास्त करून ‘क्लीनअप’ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी दोन उमेदवारांचा समावेश COMBINE 2025 MAINSच्या मेरिट लिस्टमध्ये आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पेपरफुटीप्रकरणातील कारवाईमुळे या प्रकरणातील साखळी मोठी असल्याचे समोर आहे. पुढील तपासातून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे लक्ष लागले आहे.





