स्वच्छतेत हलगर्जीपणा; ठेकेदाराला 10 हजारांचा दंड

पुणे – गणेशोत्सव काळात साफसफाईबाबत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तसेच शौचालयाची सेवा मोफत असताना नागरिकांकडून पैसे आकारल्याप्रकरणी ठेकेदारावर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. त्याच्याकडून प्रत्येकी 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

गणेशोत्सव काळात महात्मा फुले मंडई परिसर आणि अन्य ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये साफसफाई करणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. येथील साफसफाईचा ठेका शुक्रवार पेठेतील मे. बापू एन्टरप्रायजेस यांना देण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या कामामध्ये हलगर्जीपणा दिसून आल्याने मंडई अधिकारी बी. बी साबळे आणि मंडई निरीक्षक अश्‍विनी भागवत यांनी या मे. बापू एन्टरप्रायजेस यांच्याकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला.

तसेच साफसफाईच्या कामात काटेकोर दक्षता घेण्याबरोबरच यापुढे अशाप्रकारचा हलगर्जीपणा झाल्यास ठेका काढून घेण्यात येईल, अशी समज महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली. याशिवाय मंडई परिसरात असलेल्या सुलभ शौचालयामध्ये सामान्य नागरिकाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सेवेच्या बदल्यात प्रत्येकी 5 रुपये याप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येत असल्याचे दिसून आल्याने संबंधित ठेकेदाराकडून साबळे आणि भागवत यांनी 10 हजार रुपये दंड वसूल करून समज देण्यात आली. तसेच मंडई परिसरात कचरा निर्माण करणाऱ्या 14 व्यावसायिकांकडून 2,800 रुपये रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली, असे प्रशासनाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.