पुणे | शहरात पावसाच्या हलक्या सरी; सरींची दिवसाआड हजेरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात आज दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दिवसाआड हजेरी लावत असलेला पाऊस क्षणभर पडून गारवा पसरवतो. मात्र, काहीच वेळात पुन्हा ऊन पडते आणि उकाडा जाणवतो. गुरूवारी (दि. 4) शहरात कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली.
जुलै महिन्यातील आठवडा संपत आला, तरी पावसाचा जोर वाढताना दिसत नाही. एक दिवस पाऊस तर दुसऱ्या दिवशी आकाश कोरडे, अशी परिस्थिती पुण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे एन पावसाळ्यातही उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहे. आज शहरासह उपनगरांतील काही भागात पावसाच्या एक ते दोन हलक्या सरी पडल्या. त्यामुळे काहीवेळ हवेत गारवा होता.
मात्र, सायंकाळनंतर उकाडा काहीशा वाढला होता. मगरपट्टा परिसरात सर्वाधिक 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस शहरातील आकाश सामान्यत: ढगाळ राहील. पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. मात्र, आजही चांगल्या पावसाचा अंदाज नसल्याने पुणेकरांसह शेतकरी चिंतेत आलेला आहे.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा पाऊस (मिमि)
लवासा – 75, लोणावळा – 28, गिरीवन – 19, माळीन – 8, एनडीए – 7, खेड – 3, लवळे आणि चिंचवड – 1 तर पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात – 0.5 मिमी पावसाची नोंद झाली.




